मराठी भाषा भारतासह मॉरीशस व इस्त्राएल या देशातही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड येथेही बोलली जाते. भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैद्राबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तामिळनाडू) भारताचे संविधानातील २२ अनूसुचित (अधिकृत) भाषेच्या सुचीत मराठीचा समावेश आहे.मराठी, महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात व दमण आणि दीव, दादरा व नगर हवेली या केंदशासीत प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी) महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे) उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश) गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (नवी दिल्ली) येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत.